महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये पार पडणार असून त्यापूर्वीच युती आणि आघाड्यांसदर्भातील बैठकांची सत्रं सुरु झाली आहेत. महायुतीमधील जागावाटप असो किंवा महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहभागी करुन घेणं असून अनेक गोष्टींबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार असल्याचं स्पष्ट होतं आहे. असं असलं तरी 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एका निवडणुकीमध्ये (elections)चक्क भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची युती होणार आहे. राजकीय विरोध बाजूला ठेऊन हे दोन्ही नेते एकत्र येत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मात्र ही निवडणूक आहे कोणती आणि हे दोघे एकत्र येण्यामागील समिकरण काय हे समजून घेणं गरजेचं आहे.
ही निवडणूक कोणती?
लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक (elections)असो महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगल्याचं पाहायला मिळालं. असेच चित्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसणार असला तरी त्यापूर्वी म्हणजेच पुढच्या महिन्यात 12 तारखेला पार पडत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत मात्र भाजपचे फडणवीस आणि शरद पवार हे दोघे पडद्याआडून एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. राजकारणामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची, टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी क्रिकेटच्या मैदानात राजकारण ऑप्शनला ठेवत सहकार्याची भूमिका स्वीकारली आहे.
अनेक बडे नेते मतदार
एमसीएच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रमुख शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह आशिष शेलार, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, नाना पटोले, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, रवींद्र चव्हाण, सचिन अहिर, प्रताप सरनाईक, विश्वजीत कदम, विहंग सरनाईक असे सर्वपक्षीय मतदार आहेत. एमसीए निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सत्ताधाऱ्यांशी विरोधक हातमिळवणी करीत असून, सत्ताधाऱ्यांमधील नेतेच एकमेकांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी सज्ज झाले असल्याचे खात्रीलायक सूत्रांचं म्हणणं आहे. या निवडणुकीवर प्रामुख्याने पवार यांची छाप आहे. मात्र, तरीही सर्वच पक्षनेते आपला उमेदवार या संघटनेमध्ये असावा, यासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहेत.
उमेदवार कोण?
सर्वच पक्षांचे नेते आपआपल्या उमेदवारासाठी ‘फिल्डिंग’ लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाड यांचे नाव समोर आलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विहंग सरनाईक यांच्यासाठी प्रयत्न आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे मिलिंद नार्वेकरांसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. पवार आणि फडणवीस एकत्र आल्यास निवडणुकीआधीच ठाकरे आणि शिंदेंची विकेट पडेल अशी चर्चा आहे.
