मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत एकूण 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. पोलिसांनी खडकीचा काच फोडून आत प्रवेश करून मुलांची सुटका केली. यावेळी रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आता या प्रकरणात रोज नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित आर्या सरकारकडे त्याचे थकलेले पैसे मागत होता, असा दावा केला जातोय. तर दुसरीकडे रोहित आर्याशी सरकारने कोणताही करार केला नव्हता, असे राज्याच्या शिक्षण विभागाने सांगितेलेले आहे. दरम्यान, असे असतानाच 17 मुलांना ओलीस ठेवण्यासाठी रोहित आर्याने चांगलाच फुलप्रुफ प्लॅन आखला असल्याचे समोर आले आहे. त्याने याच आरए स्टुडिओत ऋचिता जाधव या अभिनेत्रीलाही बोलवलं होतं. अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. खुद्द ऋचितानेच ही खळबळजक माहिती सांगितली आहे.
अभिनेत्री ऋचिता जाधव हिलाही केला होता कॉल
मुलांना ओलीस ठेवण्याचा कटाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याआधी रोहित आर्या गेल्या काही दिवसांपासून या कटाचे नियोजन आखत होता. त्याने एक चित्रपट करायचा असून त्यासाठी ऑडिशन ठेवण्यात आल्याचे ढोंग रचले होते. याच कटाचा भाग म्हणून त्याने अभिनेत्री ऋचिता जाधव हिलाही कॉल केला होता. मी तुला चित्रपटात काम करण्याची संधी देतो, तू आरए स्डुडिओत ये, असे रोहित आर्याने तिला सांगितले होते.
ऋचिता जाधवने नेमकी काय माहिती दिली.
रोहित आर्या याने मला 4 ऑक्टोबर रोजी एक मेसेज केला होता. मी एक चित्रपट करणार आहे आणि मला त्याच्याबाबतीत तुमच्याशी चर्चा करायची आहे, अशा आशयाचा हा मेसेज होता. इंग्रजी भाषेत त्याने हा मेसेज केला होता. आपण याबाबतीत बोलूयात, असं मी त्याला म्हणाले होते. संध्याकाळी मी फ्री झाल्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसात वाजता आमचे संभाषण झाले. आम्ही साधारण 9 मिनिटे फोनवरून बोललो. फोन कॉलदरम्यान त्याने मला चित्रपटाची कथा काय असेल याबाबत सांगितले. एक चांगला माणूस असतो. दहशतवादी नसतो. तो विद्यार्थ्यांना डांबून ठेवतो. त्याच्या काही मागण्या असतात. सरकारपर्यंत त्याला या मागण्या पोहोचवायच्या असतात. तो अतिशय चांगला माणुष्य असतो,
रोहित आर्याने भेटण्याचा केला होता आग्रह
चित्रपटाची कथा ऐकून घेतल्यानंतर मग या कथेमध्ये माझी भूमिका काय असेल? असे मी त्याला विचारलं होतं. त्याला उत्तर म्हणून तू विद्यार्थ्यांसोबत असलेल्या शिक्षिकेचा किंवा विद्यार्थ्याच्या पालकाची भूमिका कर. किडनॅपरचा मेसेज पोहोचवण्याचे काम तुझ्यावर तुझ्या पात्राचे असेल, असे रोहित आर्याने सांगितल्याचेही ऋचिता जाधवने सांगितले. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर मी यावर विचार करते आणि कळवते, असे रोहित आर्याला सांगितले होते. ऑडिशन लवकरच सुरू होणार असल्याचे त्याने मला सांगितले. तसेच येऊन भेटण्यासही आग्रह केला. यावेली त्याने वेनस्डे या हिंदी चित्रपटाचेही उदाहरण दिले होते. दिवळीच्या काळात त्याने मला हॅपी दीपावलीचा मेसेज केला होता. मी त्याला काही रिप्लाय केला नव्हता. त्याने नंतर मला 27, 28, किंवा 29 ऑक्टोबर रोजी भेटायचे का? असे विचारले होते. मी त्याला 28 तारखेला भेटुयात असे सांगितले. त्याने मला आरए स्टुडिओचे गुगल लोकेशन पाठवले होते, अशी माहिती ऋचिता जाधवने दिली.
सर्वांनी काळजी घ्या, कुटुंबाला माहिती द्या- ऋचिता जाधव
पुढे बोलताना, माझे सासरे राजेंद्र माने यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आमचे सर्व कुटुंब त्याच गडबडीत होते. त्यामुळे मी त्याला मसेज केला की मी येऊ शकत नाही, असे रोहित आर्याला सांगितले. आपण 15 नोव्हेंबरनंतर भेटुयात असा त्याला मेसेज केला. त्यानंतर टेक केअर असा त्याचा मला शेवटचा मेसेज होता, असे सांगत सर्वांनी काळजी घ्या. कुठे जात असाल तर कुटुंबाला त्याची माहिती द्या, असे आवाहन ऋचिता जाधवने केले.
