इचलकरंजी, सांगली नाका परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्यासमोर सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत झोकांड्या खात आल्याचे निदर्शनास आले. त्याची गांभिर्याने दखल घेत आमदार आवाडे यांनी सहाय्यक तलाठ्याची वैद्यकिय तपासणी करुन तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना वरिष्ठांना केल्या.
शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन रस्ता रुंदीकरण संदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहाय्यक तलाठी आनंदा डवरी हे सकाळी सकाळीच फुल्लटाईट असल्याचे व झोकांड्या खात असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.
आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आमदार आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. तसेच डवरी यांची तात्काळ वैद्यकिय तपासणी करुन त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना केल्या. आमदार पाहणी करण्यासाठी आले असताना शासकीय कार्यालयातील जबाबदार अधिकारी चक्क मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.
