सध्याच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होत राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसतच आहे. दिवसाढवळ्या आजकाल बंद घरावर चोरटे डल्ला मारत आहेत. तसेच अनेक गैरवर्तनाच्या प्रकारात वाढ तसेच वाहतूक नियम भंग देखील करत आहेत. इचलकरंजी शहरात गेल्या काळात मुख्य रस्त्यांवर भरधाव वेगाने, ट्रिपलसीट, विना नंबरप्लेट वाहन चालवणे, वाहतुकीचे नियम मोडणे अशा वाहनधारकांविरोधात सीसीटिव्हीच्या आधारे ऑनलाईन दंड केला जात होता. तसेच अनेक वाहन चोरीच्या घटना उघडकीस आल्या.
शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध चौकांत धुमस्टाईलने झालेल्या चोऱ्या, वाहनांच्या डिक्कीतून चोरीस गेलेली रक्कम, वाहनांची चोरी आदी घटना उघडकीस येऊन पोलिसांना तपासामध्ये मोठी मदत झाली होती. परंतु गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सीसीटिव्ही यंत्रणेची देखभाल होत नसल्याने कॅमेरे बंद पडले आहेत. पोलिस खात्याकडे देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नसल्याने शहरातील विविध चौक, रस्त्यांवर बसविण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहराची सुरक्षितता रामभरोसे आहे.
शहरात नव्याने सीसीटिव्ही बसविण्याबाबत महानगरपालिकेच्यावतीने हालचाली सुरू आहेत. तेव्हा शहराच्या विविध भागात तातडीने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे. शहरातील सीसीटिव्ही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी देखभाल दुरूस्तीचा खर्च २९ लाखांच्या पुढे जात आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात नवीन सीसीटिव्ही यंत्रणा उभारण्याची योजना आखली जात आहे. तेव्हा यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शहरात लवकरात लवकर सीसीटिव्ही कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे