दिवाळीत सांगोला एसटीचे १ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न

ग्रामीण महाराष्ट्राची जीवन वाहिनी समाजाला जाणाऱ्या एसटीच्या दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. २० ते २९ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये २ लाख ५५ हजार ४८७ किलोमीटरचे अंतर पार करत २ हजार ४४१ फेन्याच्या माध्यमातून १ कोटी ४८ लाख ४४ हजार ८५५ रुपयाच्या आर्थिक उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार प्रमुख विकास पोफळे यांनी दिली आहे.

दिपवाळी सणाच्या निमित्ताने सांगोला पुणे, आटपाडी, महुद, पंढरपूर मार्गे ही बस सोडण्यात आल्या. सांगोला अहिल्यानगर, सांगोला, पंढरपूर, कोल्हापूर मार्गे ही बस करण्यात आली. यासह दैनदिन मुंबई, पणजी, हैदराबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, आदमापूर, गाणगापूर आणि कलबुर्गी अशा गाड्या नियमितपणे सुरू ठेवण्यात आल्या होत्या. सांगोला एसटी आगाराने ज्यादा बसेस सोडून १९ हजार ७४९ किलोमीटरचा प्रवास करीत १४४ फेऱ्यांच्या माध्यमातून १० हजार ३५८ प्रवाशांची चढउतार करत ११ लाख १५ हजार ९४२ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

दिवाळीत एसटी बसला प्रवाशांनी पसंती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी आर्थिक संकट असतानादेखील महामंडळाने भाडेवाढ न करता सुसज्ज नियोजन आणि सुसूत्रता राखत एसटीच्या तिजोरीत भर घातली आहे. दरम्यान चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक एसटी आगार प्रमुख विकास पोफळे यांनी केले आहे.