प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महापालिकेच्या बांधकाम विभागातील दोन शाखा अभियंते यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. नगररचना व बांधकाम विभागातील दोन अधीक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
आयुक्तसत्यम गांधी यांनी ही कारवाई केली.
आयुक्त गांधी यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात विभागप्रमुख व अधीक्षकांची बैठक आयोजित केली होती. यात शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ, महापालिकेच्या अनुषंगाने विधिमंडळात उपस्थित झालेले प्रश्न व अन्य कामांबाबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीदरम्यान संबंधित अधीक्षकांना त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांची माहिती नव्हती. विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यांना कर्तव्यांची जाणीव नसल्याचे व प्रशासकीय जबाबदारीत हलगर्जीपणा केल्याचे आढळले. अधीक्षक हा कार्यालयाचा केंद्रबिंदू असून, त्याने प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारीने व कार्यक्षमतेने काम करणे अपेक्षित असल्याकडे आयुक्त गांधी यांनी लक्ष वेधले. नगररचना व बांधकाम विभागाकडील दोन अधीक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात आली.
शाखा अभियंता पंकजा रुईकर व शाखाअभियंता आलम अत्तार यांना निलंबित करण्यात आले. शाखा अभियंता रुईकर व अत्तार यांनी कार्यपद्धतीनुसार काम न करणे, विनापरवाना गैरहजर राहणे, तसेच वरिष्ठांच्या सूचनेशिवाय कार्यात ढिलाई केल्याचे उपअभियंत्यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यांचे कामकाज असमाधानकारक ठरल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
सत्यम गांधी, आयुक्त, महानगरपालिका.नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रशासकीय शिस्त राखणे ही प्रत्येक अधिकारी, कर्मचार्याची जबाबदारी आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
