सांगोला – कराड – दापोली बस सुरू करा, अशोक कामटे संघटनेची मागणी

सांगोला – सांगोला ते दापोली थेट बस सेवा सुरू कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी, सांगोला आगार प्रमुख विकास पोफळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी भाजपाचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, मकरंद पाटील, सचिन घाडगे, प्रा.प्रसाद खडतरे उपस्थित होते.

सांगोला परिसरातील अनेक नागरिक दापोली या ठिकाणी सेवा, व्यवसाय, शिक्षणाकरिता पाटण, कोयनानगर, चिपळूण, खेड या विविध भागामध्ये कार्यरत आहेत. तसेच या भागात पर्यटन ठिकाणे, कृषी विद्यापीठ असल्याने अनेक विद्यार्थी या भागात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी, नागरिकांना वेगवेगळ्या बस बदलून गैरसोईने प्रवास करावा लागत आहे. सोईस्कर व थेट बस सेवा तालुक्यातील प्रवाशांकरिता दररोज सांगोला येथून स. ८ वा. सांगोला ते दापोली एसटी बस सेवा नाझरे, आटपाडी, खानापूर, विटा, कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण मार्गे सुरू करावी व सकाळी परतीच्या प्रवासाकरिता दापोली येथून देखील स.७ वा. सांगोला बस सोडावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती प्रताप सरनाईक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई, राज्य व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांनाही देण्यात आले आहेत. याबाबत एसटी प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन देतेवेळी सांगितले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी सांगितले.

सध्या सोलापूर विभागात बसेसची कमतरता आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे या समस्या प्रश्न मागणी केली आहे. नवीन बस प्राप्त होताच अशोक कामटे संघटनेने मागणी केल्याप्रमाणे सांगोला आगारातून नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगोला दापोली या मार्गावर विविध गावांकडे जाण्याकरिता प्रवाशांची सोय होणार आहे.