आटपाडी नगरपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यात साम-दाम-दंड वापरत प्रत्येकाने आपली राजकीय रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार सुहास बाबर यांनी शेवटच्या टप्प्यात थेट विरोधतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्याकडे आणला आहे.
नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार गुरुप्रसाद कवडे यांना शेवटच्या टप्प्यात माघार घेत थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. भाजप, शिवसेना आणि तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीने प्रचारात वेग घेतला आहे. शेवटच्या टप्प्यात सर्व अस्त्राचा वापर सुरू असून फोडाफोडीची सरस ठरली आहे.
शिवसेनेने शेवटच्या टप्प्यात चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच गळाला लावून विरोधकाना धक्का दिला. यापूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नगराध्यक्षाचे उमेदवार सादिक खाटीक यांनी उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर तानाजीराव पाटील यांनी भिंगेवाडी येथील मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. रासपाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे आणि जनता दलाचे माजी तालुकाध्यक्ष आबासो सागर यांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले.
विरोधकांना धक्क्यावर धक्के देणाऱ्या शिवसेनेने शेवटच्या टप्प्यातही धक्कातंत्र सुरूच ठेवले आहे. या तिघांच्याही जाहीरनाम्यातील कामे मार्गी लावण्याचा शब्द तानाजीराव पाटील यांनी दिल्याने पाठिंबा दिल्याचे गुरुप्रसाद कवडे, सत्यजित गलांडे आणि आबासो सागर यांनी सांगितले. तिघांचेही पाटील यांनी स्वागत करून सुचवलेली कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे.
