उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक सज्ज! नियंत्रण कक्ष सुरू, ईव्हीएम तपासणीसह सर्व तयारी शंभर टक्के पूर्ण!

उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून २ डिसेंबर रोजी होणारे मतदान आणि ३ रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी तहसील कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ‘ईव्हीएम’सह संपूर्ण यंत्रसामग्रीची बारकाईने तपासणी करण्यात आली.

ही तपासणी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत पार पडल्याने पारदर्शकता राखली गेल्याचे प्रशासनाचे मत आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह ३० नगरसेवक पदांसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी, ३ डिसेंबरला तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर मतमोजणी होणार आहे.

मतदान आणि मतमोजणी दोन्हीसाठी तळमजला व तिसरा मजला अशा दोन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले आहेत. मतदान यंत्रांची तपासणी करताना प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना ‘ईव्हीएम’ची रचना, वापर, सीलिंग प्रक्रिया याची माहिती देण्यात आली. उमेदवारांनी केलेल्या शंका-निरसनाच्या मागण्या तातडीने सोडवण्यात आल्या.

मतमोजणी प्रक्रियेसाठी १५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून पोस्टल मतदान आणि सेवादलाच्या मतांसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले.

आकडे बोलतात…

दुबार मतदार: २,५७०

एकूण प्रभाग: १५

एकूण मतदान केंद्र: ६७

केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ): ६३

क्षेत्रीय अधिकारी (झेडओ): १०

एकूण कर्मचारी: ३२०

आवश्यक पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक

उरुण-ईश्वरपूरात असे आहेत मतदार…

एकूण मतदार: ६४,२१५

स्त्री: ३२,३४०

पुरुष: ३१,८७१

इतर: ४