सतत काही ना काही वाद हे विरोधी पक्षात पहायला मिळतात. असाच एक राडा हातकणंगलेतील भेंडवडेत येथे झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे राजकीय वैमनस्यातून माने व निकम गटांत शुक्रवारी झालेल्या राडाप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. छ. राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांच्यासह दोन्ही गटांतील ५० हून अधिकजणांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, गावात दुसऱ्या दिवशीही तणावाचे वातावरण होते. निकम गटाच्या बालाजी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय कुंभार यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केल्याच्या रागातून सर्जेराव दिनकर माने यांनी तलवारीने तर संतोष बाळासो निकम यांना काठीने मारहाण केली.
तसेच मोपेड (एमएच ०९ जीबी २५१५) जाळण्यात आल्याबाबत राजवर्धन संभाजी माने, शशिकांत शामराव माने, बाळासो दिनकर माने, प्रफुल्ल रंगराव माने, प्रदीप प्रकाश माने, विजय संपतराव माने, अनिकेत चंद्रकांत माने, सौरभ संभाजी माने, पोपटदिनकर माने आदींसह १५ ते २० अज्ञातांविरोधात फिर्याद देण्यात आली.
माने गटाचे दशरथ देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देसाई यांच्यासह ऋषीकेश कोळी, आसिफ पठाण हे माने गटाबरोबर राजकारणात सक्रिय असल्याच्या कारणावरून चिडून त्यांना रस्त्यात अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, काठी, रॉड व दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी बालाजी निकम, उत्तम निकम, उमेश निकम, सागर चव्हाण, उदय निकम, पार्थ निकम, संतोष निकम, सागर हुजरे, विठ्ठल निकम, अशोक एडके, श्रीवर्धन चव्हाण, अनिकेत बुकशेट, राज निकम, दादा रुपेश चव्हाण, सुरज नरुटे, हणमंत नरुटे, अर्जुन निकम, राजू बुजले, प्रमोद वासुदेव, जीवन कुंभार, विनायक कुंभार, दशरथ कुंभार, निखिल राजाराम निकम, विक्रम पसाले, प्रतीक पसाले, उदय निकम, अमोल दाईंगडे, गोरख कांबळे, किशोर चव्हाण, नुरमहंमद मुलाणी, रोहन पसाले, बबन एडगे, अतुल चव्हाण आदींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.