हिवाळा आरोग्यदायी ऋतू असल्यामुळे ‘तब्येतीत’ राहण्यासाठी आणि आणखी तब्येत कमविण्यासाठी घरोघरी पौष्टिक लाडू बनवले जात आहेत. यासाठी गृहिणींची सुकामेव्याच्या दुकानांवर गर्दी दिसून येत आहे. तयार लाडूही ६०० रुपये किलोपासून उपलब्ध आहेत. हिवाळ्यात पौष्टिक अन्न खाल्ल्यास ते ‘अंगी’ लागते, असे मानतात. त्यामुळे घरोघरी लाडू बनविण्याचे वेध लागतात.
लाडवांसाठी सुकामेवा, मेथी, डिंक, उडीद आदींचा वापर केला जातो. सकाळी अनशापोटी मेथीचा लाडू खाल्ल्याने शक्ती वाढते, असे जुनी जाणती माणसे म्हणतात. त्यामुळे घरोघरी विद्यार्थी, तरुणांना या लाडूंचा आग्रहाने खुराक दिला जाताना दिसून येत आहे.
दैनंदिन काम करतानाच गृहिणी लाडू बनविण्याचे कामही आनंदाने करताना दिसत आहेत. इतर लाडुंपेक्षा हे लाडू बनवायला जास्त कष्ट आणि वेळ लागतो. सर्वसामान्य घरांमध्ये हे लाडू घरीच वळले जातात. मात्र, नोकरदारांकडे रेडिमेड लाडवांना पसंती दिली जाते. बाजारात रेडिमेड लाडू ६०० ते ८०० रुपये दराप्रमाणे उपलब्ध आहेत.
लाडवांची रेसिपी
पौष्टिक लाडूंमध्ये मेथी, डिंकाबरोबरच सुकामेव्यातील खारीक, खोबरे, काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड, गोडंबी, जायफळ, गुळ, तुप, आवडीनुसार गव्हाचे पीठ मिसळण्यात येते. मेथीचे पीठ गायीच्या तुपात भाजून दोन ते तीन दिवस झाकून ठेवावे लागते. तसेच खोबऱ्याचा कीस करुन त्याला हलकेसे तव्यावर हलवून घ्यावे लागते. सुकामेव्याचे बारीक तुकडे नाहीतर पुड करुन पीठात टाकावी. डिंक तुपात तळून घेतल्यावर तोही बारीक करुन घ्यावा. गुळाला तुपात विरघळून घेतल्यावर पीठाच्या मिश्रणात ढवळावे आणि काही वेळात लाडू वळावे.