ईश्वरपूर : ऊसामध्ये वाढलेला बिबट्यांचा वावर आणि महावितरणचा रात्रीचा वीज पुरवठा; शेतकरी अक्षरशः जीव मुठीत धरून शेतात

महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांमधील शेती क्षेत्रांमध्ये अद्यापही रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंतच वीजपुरवठा केला जात आहे. बिबट्या, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्य जीव यांच्या धोक्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.

त्यामुळे शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. ऊस पीक हे त्यांचे आश्रयस्थान बनले असल्याने प्रत्येक गावाच्या बाहेरील शेतात त्यांचे नित्य दर्शन होत आहे.

अनेकदा बिबट्यांनी मनुष्यांवर हल्लेही केले आहेत. हे सर्व माहीत असूनही शेतकरी आपल्या पिकांसाठी जीव धोक्यात घालून रात्री शेतात पाणी देण्यासाठी जात आहेत, कारण महावितरण कंपनीकडून शेती पंपांना पुरवठा रात्री केला जात आहे.

१ डिसेंबरपासून तालुक्यातील शेती वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलून आठवड्यातील काही दिवस रात्री नऊ ते पाच आणि काही दिवस दिवसा नऊ ते पाच असा क्रम ठेवण्यात आला आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रात्री ९ ते ५ या कालावधीत शेतात जाऊन पाणी देणे, दारे धरणे ही कामे व्यवस्थितरीत्या होऊ शकत नाहीत. संपूर्ण क्षेत्राला योग्य पाणी मिळेल याची शाश्वती राहात नाही. शेतीपंपांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे.

बोरगाव सबस्टेशनच्या पूर्वेकडील भागात, तसेच शिराळा तालुक्यातील काही भागांमध्ये दिवसा शेतीपंपांना वीजपुरवठा सुरू आहे. त्यांना दिवसात वीज मिळते, मग आम्हाला दिवसा वीज का मिळू नये? आम्ही जीव धोक्यात घालून रात्री पिकांना पाणी देत आहोत.

प्रदीप जाधव, शेतकरी, धोत्रेवाडी-तांबवे (ता. वाळवा)

दृिष्टक्षेपात…

शेतीपंपांना रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंतच वीजपुरवठा

रात्री वीजपुरवठा असल्यामुळे बिबट्या व इतर वन्यजीवांच्या धोका

गेल्या ४-५ वर्षांत तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला

ऊस पिकात त्यांचे आश्रयस्थान तयार

अनेकदा बिबट्यांचे मनुष्यांवर हल्ले

रात्रीच्या वेळी शेतात काम करणे कठीण