पोलिस कारवाईच्या भीतीने पळून गेलेल्या एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. करण पांडुरंग मस्के (वय १७, मस्के मळा, वाघवाडी, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे.
त्याचे वडील पांडुरंग शिवाजी मस्के (वय ५६) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात (Ishwarpur Police Station) फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. १३) रात्री ही घटना घडली.
अमोल वाघ यांच्या गट नंबर २८४ मधील जमिनीतील विहिरीत त्याचा मंगळवारी (ता. १६) मृतदेह आढळला. घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली माहिती : शनिवारी वाघवाडी हद्दीत एका ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचा निनावी फोन पोलिसांना आला. त्यावरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
मृत करण हा त्याठिकाणी उपस्थित होता. त्याचे वडील आणि अन्य दोघेही उपस्थित होते. पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला. वडिलांच्या पाठोपाठ करणही तिथून निघून गेला. करण हा सध्या एका आश्रमशाळेत शिकत होता. त्याच्या घरी एक कार्यक्रम असल्याने तो गावाकडे आला होता. वडील असलेल्या शेडवर तोही गेला होता.
त्यादरम्यान पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. या घटनेनंतर करण कुठेच सापडत नसल्याने त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, काल त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना काहींना आढळला. करणचा विहिरीच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
