शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर बुधवारी सायंकाळी चार वाजता निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार, याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.१४ सप्टेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे ५०० पानांचे निकालपत्र तयार होत आहे.
विधानसभा अध्यक्ष विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगण्यात आले.आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात तब्बल १० महिने झालेल्या सुनावणीनंतर १४ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.
या निकालानुसार पक्ष कुणाचा आणि आमदार पात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली. आता ते नेमका काय निकाल देतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
या मुद्यांवर ठरणार निकाल
विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी बजावलेला व्हीप व मतदान
विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप व मतदान
सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानुसार कोणाचा व्हीप पात्र
सुरत, गुवाहाटीला जाणे ही पक्षविरोधी कारवाई ठरते का?
दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे, पुरावे
उलट तपासणीवेळी साक्षीदारांची उत्तरे व वकिलांचा युक्तिवाद