जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढूया: आमदार जयंत पाटील; आघाडीबाबत नेमकं काय म्हणाले?

”जतमध्ये काँग्रेस पक्षाशी आघाडी करून निवडणूक लढलो असतो, तर निकाल वेगळा पाहायला मिळाला असता. आपल्या पक्षाला नगरपालिका निवडणुकीत जे यश मिळाले, ते माझ्या एकट्याचे नसून आपण कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे यश आहे.

येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही ताकदीने लढून पक्षाची ताकद दाखवून देऊ,” असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

कासेगाव (ता. वाळवा) येथील जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. येथील पदयात्री स्मारकात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उरुण-ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, आष्ट्याचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, तसेच उरुण-ईश्वरपूर,आष्टा व तासगाव नगरपालिका निवडणुकीत विजयी नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, मनोज शिंदे, रावसाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, सरपंच कल्पना गावडे प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ”नगरपालिका निवडणुकीत उरुण-ईश्वरपूर,आष्टा व तासगाव शहरात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. सांगली, कुपवाड व मिरज महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करून ताकदीचे उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळू शकते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपणाशी चर्चा करून दिशा निश्चित केली जाईल. या निवडणुकीत सर्व जागा लढविण्याऐवजी पक्षाची ताकद असणाऱ्या जागा लढविण्यावर भर देणार आहोत.”

माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, ”येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला पक्ष जिल्ह्यात नंबर वन करण्यासाठी कामाला लागूया.”

जिल्हाध्यक्ष देवराज पाटील म्हणाले,”नगरपालिका निवडणुकीत आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वातील यशामुळे जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पक्षाची ताकद दाखवू.”

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तजुद्दीन तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच वैभव शिंदे, आनंदराव मलगुंडे, विशाल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. राजाराबापू दूध संघांचे अध्यक्ष संग्राम फडतरे, शहाजी पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील उपस्थित होते. प्रा. कृष्णा मंडले यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष टी. व्ही. पाटील यांनी आभार मानले.