नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशावर 56 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते; ते त्यांनी 10 वर्षांत 210 लाख कोटी रुपयांवर नेले. त्यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली नाही. युवक व महिलांसाठी उद्योग-रोजगार निर्माण केला नाही, तर देशातील मूठभर श्रीमंतांची 25 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली.
भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देशावरील कर्जे कमी करण्यासाठी जीएसटीसारखे कर वाढवू शकते, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभा झाली. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, तानाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शिवसेनेचे शकील सय्यद, योजना पाटील, अलका राजे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, देशातील लोकशाही आणि संविधान टिकविण्यासाठी तसेच बहुजनांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा. एखाद्या शेतकऱयाने 1 लाखाची खते घेतली, तर त्यातून 18 हजार जीएसटी कर घेऊन शेतकऱयांना 6-6 हजार देत आहेत. ही पाकीटमारी आहे. सत्यजित पाटील हा नवा चेहरा दिला आहे. कामाचा माणूस आहे. त्यांना मतदान करून महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.