महापौरपदासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या आवाहनावर शिंदे यांच्या मंत्र्याचं एकदम व्यवहारीक उत्तर

आजपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांचा आज जन्म दिवस आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत शिवसेनेचा महापौर बसणार नाही, याचं मला प्रचंड दु:ख आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. ते म्हणाले की, जे कोणी म्हणतात आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. ज्यांची बाळासाहेबांवर श्रद्ध आहे, त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबई महापौरपदासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना माझे सांगणे आहे की, बाळासाहेब यांचा आज जन्मदिन आहे. एकनाथ शिंदे त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांनी अनुभूती दिली आहे. विधानसभेत पाहिलं आहे. उलट त्यांनीच धनुष्यबाण असलेल्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा” असं उत्तर दादा भुसे यांनी दिलं.

“भाजपासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे की, केंद्रात आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तुमच्यासोबत राहू. महाराष्ट्रात तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे, तुमच्या बरोबर राहू. पण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून आपल्या मुंबईवर हा शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे” असं भास्कर जाधव म्हणाले.