ईश्वरपूर पोलिस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले सुमारे 18 लाख 27 हजार किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 102 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून ही मोहीम राबवण्यात आली.
शनिवारी पोलिस ठाण्यात बोलावून मूळ मालकांना त्यांचे मोबाईल देण्यात आले.
ईश्वरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून तसेच बाजारपेठ, बसस्थानक परिसरातून मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त केली. पथकाने जिल्ह्यातून व बाहेरील राज्यातून 102 मोबाईल हॅण्डसेट हस्तगत केले. पोलिसांनी या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेतला व त्यांना त्यांचे मोबाईल परत केले. पोलिस हवलदार कुबेर खोत, अमोल सावंत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, चंद्रकांत वंजारी, सायबरचे अभिजित पाटील, विवेक साळुंखे यांनी कारवाईत भाग घेतला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मोबाईल धारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
