जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका निःपक्षपाती व्हाव्यात, लोकशाहीच्या या उत्सवास करणी, जादूटोणा अशा अंधश्रद्धांचा आधार घेतला जात आहे, ही निषेधार्ह बाब आहे.
अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या आहेत.
करणी, जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे तत्सम प्रकार करणाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.
चमत्कारिक गोष्टी सिद्ध करणाऱ्यास समितीचे २१ लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले. विटा येथे एका नेत्याच्या घरासमोर असे अंधश्रद्धेचे, करणीचे प्रकार करणाऱ्यास रंगेहाथ पकडले. संबंधित व्यक्तीला पोलिसाच्या हवाली केले. या घटनेचा निषेध करतो. पोलिसांनी अशा प्रवृत्तींना वेळी रोखले पाहिजे, संबंधित जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यापक प्रबोधन करून जनजागृती केली होती. आष्टा, इस्लामपूर, कामेरी आदी ठिकाणी संघटनेने प्रबोधन करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले. येलूरमध्येही नेत्यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचे उघडकीस आले होते.
पोलिसांनी ‘सुमोटो’अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. आवश्यकता असेल तिथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मदत करतील. गावोगाव जाऊन प्रबोधन करतील. पोलिसांनी काही महिन्यापूर्वी प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कक्ष करण्याचा आदेश पारित केला.
मात्र अद्याप जिल्ह्यात कोणत्या पोलिस ठाण्यात असा कक्ष झाल्याचे ऐकिवात नाही. करणी, जादूटोणा किंवा देव घालण्याचे कुणाकडे सामर्थ्य असेल तर त्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे थेट आव्हान आहे. अशा गोष्टी सिद्ध करणाऱ्यास २१ लाख रुपयांचे बक्षीस आहे.
आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांचा आधार घेणे, हा ज्ञाना, विज्ञान, माणुसकीचा पराभव आहे. महाराष्ट्रा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी काम करीत आहे. प्रबोधनाच्या पातळीवर आम्ही नेहमीच सज्ज आहोत, नागरिकांच्या जागृतीसाठी आम्ही कार्यकर्ते तत्पर आहोत.
