राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळाजवळ बुधवारी दि.२८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला.त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून महाराष्ट्र राज्याची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांचे मूळगाव असलेल्या बारामती प्रमाणे सांगोला तालुक्यातील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. सांगोला शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी शाळा व व्यवहार बंद ठेवून तसेच सोशल मीडियाद्वारे अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती दुःखद निधनाबद्दल राज्यात शासकीय दुःखवटा जाहीर केला. त्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी सांगोला शहरातील व तालुक्यातील व्यापारी बंधूंनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून दुःखामध्ये सामील झाले. तसेच शाळा ही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सांगोला येथील श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती यांच्या वतीने बुधवार दि.२८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला शेतकरी प्रदर्शन व विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ व शोभेचे दारू काम या दुर्दैवी घटनेमुळे रद्द करण्यात आला.
