शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा नियोजित कट आहे. सिंचनाखालील असणारी सुपीक शेती, गावे आणि जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.
न मागता महामार्ग का देता? त्यासाठी सिंचनासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली एक इंचही जमीन देणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. महामार्गाच्या विरोधात दि. 27 फेब्रुवारीला ईश्वरपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादीचे कॉ. धनाजी गुरव, कॉ. दिग्विजय पाटील, दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, प्रा. रणजित चव्हाण, अजित हवालदार आणि संतोष गोठणकर, दीपक कोठावळे यांची उपस्थिती होती.
डॉ. पाटणकर म्हणाले, देवधर्माच्या नावाखाली शक्तीपीठाचा मुलामा देऊन दोन चार भांडवलदारांच्या फायद्यासाठी लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव आहे. कृष्णा-वारणा खोऱ्यातील सुपीक जमीन, सिंचन योजना, धरणग्रस्त पुनर्वसन, ग्रामीण रस्ते आणि गावांचा नैसर्गिक संपर्क तोडणारा हा महामार्ग म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या मानेवरचा फास आहे. यामुळे साखर कारखानदारीही उद्ध्वस्त होईल. वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी, नवे व जुनेखेड, वाळवा, उरुण, येडेनिपाणी, कामेरी, येलूर, इटकरे कुरळप, ऐतवडेमार्गे हा शक्ती मार्ग कोल्हापूर जिल्ह्यात जाईल. पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता तिकडे तीव्र विरोध आहे म्हणून बदलला आणि वाळवा तालुक्यात आणला गेला. तीव्र विरोध हाच निकष असेल तर आम्हीही त्याला तीव्र विरोध करू.
बी. जी. पाटील म्हणाले, या महामार्गामुळे पुराचा धोका वाढणार आहे. पाणी साचून शेती नापीक होणार आहे, ऊस व इतर पिकांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार आहे. सरकारने हा प्रकल्प तत्काळ रद्द केला नाही, तर शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त आणि कष्टकरी जनतेला घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. कॉ. धनाजी गुरव म्हणाले, सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा किंवा विरोध याबाबत कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला गावागावांत जाब विचारला जाईल. अन्यथा थेट उमेदवारांनी आपली भूमिका जाहीर करावी. सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करताना समर्थन दिले तर महामार्ग बाधित गावातून एकही मत देणार नसल्याचे यावेळी जाहीर केले गेले.
