जुन्या, नव्या उच्चशिक्षित कारभाऱ्यांची एन्ट्री..!

वाळवा पंचायत समितीत गावगाड्यातील अनुभवी जुन्या, नव्या, उच्चशिक्षित पदाधिकाऱ्यांनी एन्ट्री केली आहे. राजकीय पदाधिकारी, नेत्यांचे सगेसोयरेदेखील सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

त्यामुळे नूतन पदाधिकारी तितक्याच ताकदीने ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय देतील, प्रशासकीय अनुभव पणाला लावतील, अशीच अपेक्षा नागरिकांची आहे.

सुरुवातीपासून वाळवा पंचायत समितीचा विकासकामांसाठी आपला असा लौकिक राहिला आहे. वेळोवेळी पदाधिकाऱ्यांनी त्यात भरच घातली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वाळवा पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी (श. प.) चे 14 सदस्य, महायुतीतील भाजपचे 4, शिवसेनेचे 4 असे 22 सदस्य आले आहेत. ताकारी गणातून रूपाली सपाटे या पुन्हा पंचायत समितीसाठी निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील या कासेगाव गणातून निवडून आल्या आहेत. राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांच्या पत्नी वृषाली पाटील या उच्चशिक्षित असून त्यांनी अभियांत्रिकीतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या पेठ गणाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

वाटेगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी पंचायत समितीत एन्ट्री केली आहे. त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. प्रदीप पाटील हेदेखील कापूसखेडचे माजी सरपंच आहेत. ते आता साखराळे गणाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. येलूरचे पुष्कराज पाटील हे माजी सरपंच आहेत. ते येलूर गणाचे प्रतिनिधी आहेत. नेर्ले गणाचे प्रतिनिधीत्व करणारे समर्थ पाटील हे मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजपचे जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांचे पाहुणे आहेत. समर्थ हे 23 वर्षांचे असून त्यांनी कृषी पदवी घेतली आहे. ते वाळवा पंचायत समितीतील सर्वात तरुण चेहरा आहेत. समर्थचे वडील सतीश पाटील हे तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष आहेत. मनोज पाटील हे बहे गावचे माजी उपसरपंच आहेत. ते बोरगाव गणातून निवडून आले आहेत. किल्लेमच्छिंद्रगड गणाच्या स्वाती मदने यांचे पती संभाजी मदने हे उपसरपंच आहेत. मार्केट कमिटीचे संचालक चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी नीता पाटील या गोटखिंडी गणातून निवडून आल्या आहेत. बागणी गणातून शिगाव येथील उदयसिंह पाटील निवडून आले आहेत. त्यांनी शिगावचे सरपंच म्हणून अनेक वर्षे काम केलेले आहे. आता पक्षाचे नेते सभापतीपदाची संधी कोणाला देतात याची तालुक्याला उत्कंठा राहिली आहे.