फेडरेशनकडून ५ हजार क्विंटल मका खरेदीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ३१ जानेवारी २०२६ पासून सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांचा मका खरेदी बंद केला आहे.परिणामी तालुक्यातील ७४१ शेतकऱ्यांकडून नोंदणी झालेला २१ हजार १९८ क्विंटल मका खरेदीविना दारात पडून आहे.
फेडरेशनकडून नोंदीत मका तातडीने खरेदी करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
राज्य शासनामार्फत किमान आधारभूत २४०० प्रतिक्विंटल किमतीवर भरडधान्य खरेदी केंद्र, सांगोला या ठिकाणी सोमवारी, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी मका खरेदीला सुरुवात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार श्रीमती बाळताई भागवत यांच्या हस्ते झाला होता.
दरम्यान, सांगोला तालुक्यातील सुमारे ९१३ शेतकऱ्यांनी ११२५ हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २६ हजार ४६५ क्विंटल मक्याची नोंदणी सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाकडे केली होती.
त्यापैकी १७२ शेतकऱ्यांची नोंदणी केलेली ५,२६७ क्विंटल मका खरेदी केली आहे, तर नोंदणी केलेल्या ७४१ शेतकऱ्यांचा २१,१९८ क्विंटल मका खरेदीविना शेतकऱ्यांच्या दारात पडून आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी २० हजार क्विंटल हमीभावाने मका खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी सांगोला तालुक्याला दिलेले ५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट खरेदी-विक्री संघाकडून पूर्ण केल्याने मका खरेदी बंद केली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळाल्यानंतर शेतकऱ्यांची मका खरेदी केली जाणार आहे. – रमेश जाधव, चेअरमन, खरेदी विक्री संघ, सांगोला
शेतकऱ्यांनी भुसार व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटलला १८०० रुपये दराने मका विक्री केल्यास क्विंटलमागे ६०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करून खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केलेली खरेदी करावी. – पिंटू म्हमाणे, शेतकरी, कमलापूर
शासनाने आधारभूत किमतीवर मका खरेदी केंद्र चालू केले; परंतु अवघ्या २५ दिवसांतच बंद केल्यामुळे माझा १०० क्विंटल मका दारात पडून आहे. शासनाने बंद केलेला मका खरेदी केंद्र चालू न केल्यास सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. – दीपक पवार, शेतकरी
