नर्सरीतून खरेदी केलेल्या खरबुजाच्या बियाण्यांपासून दर्जाहीन उत्पादन मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१६) थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या दालनातच खराब झालेली खरबूज नेऊन आपला संताप व्यक्त केला.
मोहोळ तालुक्यातील वडदेगाव, अनगर, बेगमपूर तसेच पंढरपूर आणि सांगोला परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे ४० एकरांवर खरबुजाच्या सुधारित वाणाची लागवड केली होती. मुंबईतील वाशी आणि दिल्लीच्या बाजारपेठेत या वाणाला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठी आशा लावून ही लागवड केली. मात्र प्रत्यक्षात वेलींना लगडलेली फळे अत्यंत निकृष्ट दर्जाची निघाली आहेत. परंतु आता दर्जाहीन फळांमुळे स्थानिक आणि बाहेरील बाजारपेठेत या खरबुजांना कोणीही खरेदी करायला तयार नाही.
याबाबत कंपनीकडे तक्रार केली, पण कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. या कंपनीच्या बियाणातच दोष असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र कंपनीने ‘वाढत्या तापमानामुळे फळ पांढरे पडले’ असे सांगून हात झटकले आहेत. एका विशिष्ट टप्प्यातील १,२०० किलो बियाण्यांच्या उत्पादनातच ही समस्या उद्भविल्याचे शेतकऱ्यांनी पुराव्यासह निदर्शनास आणून दिले आहे.
तकऱ्यांच्या या निवेदनाची दखल घेत आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आंदोलनात पांडुरंग दळवी, चैतन्य डुबळ, लखन माने, केशव पाटील, अण्णासाहेब काळे यांच्यासह अनेक बाधित शेतकरी सहभागी झाले होते.
