सध्या अनेक शहरांमध्ये तसेच खेडोपाड्यांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याला प्रतिसाद देखील उस्फुर्त मिळतो. इस्लामपुरात देखील अनेक स्पर्धा घेतल्या जातात. येत्या गुरुवारी म्हणजेच २३ जानेवारीला राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. खासदार एस. डी. पाटील यांच्या ११४ व्या जयंती समारंभानिमित्त ३८ व्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा शुभारंभ रयत शिक्षण संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अजितकुमार पाटील यांच्या हस्ते गुरूवार २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वा. ४५ मि. इस्लामपूर येथे वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती सामना समितीचे अध्यक्ष संजयकाका पाटील यांनी दिली.
संजयकाका पाटील म्हणाले, खासदार एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ता. २६ जानेवारी रोजी दु ४ वा. सतीश चरापले उद्योजक, इस्लामपूर यांच्या हस्ते विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे. राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे हे ३८ वे वर्ष आहे. खासदार एस.डी. पाटील सुवर्ण चपक व ६० हजार रुपयांचे रोख बक्षीस विजेत्या संघाला तर उपविजेत्या संघाला ४१ हजार रुपये रोख बक्षीस रौप्य चषक दिला जाणार आहे.