चारा टंचाईवर मात करण्यासाठी मका बियाणे; वाळवा तालुक्यातील २४ पशुवैद्यकीय दवाखान्यांत बियाणे मोफत उपलब्ध

उन्हाळ्यामध्ये जनावरांना होणाऱ्या चारा टंचाईवर मात करून त्या कालावधीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वाळवा तालुक्यातील २४ पशुवैद्यकीय दवाखान्यात २१ टन मका बियाणे मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी नजीकाच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे. दीड लाखांपेक्षा अधिक पशुधन असलेल्या वाळवा तालुक्यात पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाईची शक्यता आहे.

यासाठी शासनाने पुढाकार घेत चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन सुरू केले आहे. कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या काठावर वसलेल्या वाळवा तालुक्यात शेतीपूरक म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी किमान दोन, तर जास्तीत जास्त दहापेक्षा अधिक जनावरांची संख्या आहे.

तालुक्यात ऊस हे प्रमुख नगदी पीक घेतले जात असल्याने जनावरांची चाऱ्याची गरज भागली जाते. यंदा अधिक पाऊस झाल्याने उसाची लागवडही कमी, त्याचबरोबर जाणाऱ्या उसाची वाढ आवश्यक तितकी झालेली नव्हती. उसाचे उत्पादन कमी झाल्याने साखर कारखानेही कमी दिवस चालतील. तेव्हा चाऱ्याची भीषण टंचाई जाणवणार आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने जनावरांच्या संख्येनुसार वर्षभर ओला, सुका चारा कसा पुरेल, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेतात काही क्षेत्रात चारा पिके घेऊन त्यांचा मुरघास तयार करून सीलबंद करून ठेवता येणे शक्य आहे.

त्याचा वापर करून मुरघासही करून घ्यावा, यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेत प्रत्येक शेतकऱ्याला हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी ‘आफ्रिकन टॉल’ वाणाचे मक्याचे बियाणे मोफत उपलब्ध करून दिले आहे.

संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन मका बियाणे घेऊन त्याचा लाभ घ्यावा. पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील काही क्षेत्र हे जनावरंच्या चाऱ्यासाठी शिल्लक ठेवत असे. काही अन्नधान्य व चाऱ्याची पूर्तता होणारी पिकेही घेतली जात होती.

त्यामुळे जनावरांना बारामाही मुबलक चारा मिळत होता. जनावरे धष्टपुष्ट होती. दुधाचे उत्पादन जास्त होते. निरोगी जनावरे राहिल्याने त्याच्या रोगराईचे प्रमाणही कमी होते. देशी जनावरांची संख्या जास्त होती.

परंतु आज रोजी तालुक्यात सर्वत्र पाणी फिरल्याने प्रत्येक शेतकरी शेतात उसाची लागवड करू लागला. मुख्य चारा पीक घेण्याकडे दुर्लक्ष झाले. यासाठी कृषी, पशुसंवर्धन प्रशासनाने पुढाकार घेत शेतकऱ्यांत जागृती करून उसाव्यतिरिक्त इतर चारा पिके घेण्यासठी प्रबोधन सुरू केले आहे.

तालुक्यातील पशुधन

■ संकरित गायी…… ४७,३६२

■ म्हशी ……….. ७३,७२९

■ शेळ्या ……….. १७,२४७

■ मेंढ्या ७,२०२

पाच किलो मका बियाणे लागवड केल्यानंतर तीन ते चार टन हिरवा चारा उत्पादन निघते. त्यापासून जनावरांना प्रोटिनचा पुरवठा होतो. दूध उत्पादनात वाढ होते. पशुपालकांनी शेतात मका चारा पीक घेऊन शिल्लक चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवावा. चारा टंचाईच्या कालावधीत याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा