सांगोला जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही आजपासून बंद

सध्या देशभरातील तरुण पिढीबरोबरच लहान मुले, महिला आणि अगदी वयोवृद्ध व्यक्तींनाही मोबाईल आणि टीव्हीचे जणू व्यसन लागले आहे.

मोबाईलच्या आहारी गेल्याने शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्यच अंधारात जात असल्याने २५ फेब्रुवारीपासून दररोज सायंकाळी ७ते रात्री ९ पर्यंत जवळा (ता. सांगोला) या गावातील मोबाईल आणि टीव्हीसह अन्य डिजिटल स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय युवा नेते अॅड. यशराजे साळुंखे-पाटील यांच्या संकल्पनेतून जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी घेतला आहे.

सध्या स्मार्टफोनचा वापर विद्यार्थ्यांमध्ये झपाट्याने वाढत असून त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्य, अभ्यास आणि वर्तणुकीवर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. लहान मुलांच्या आईसुद्धा आपले मुल रडत असल्यास त्याला गप्प बसविण्यासाठी मोबाईल देत आहेत. त्यापासून आपली तात्पुरती सुटका होत असली तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम लहान मुलांच्या जीवनावर होत आहेत. ऑनलाइन शिक्षण, सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स आणि मनोरंजनाच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक विद्यार्थी दिवसातील पाच ते सात तास मोबाईलवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात शिक्षणाचे आणि संस्काराचे धडे गिरवायला पाहिजे त्याच वयात शालेय मुले मोबाईच्या आहारी जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे, अभ्यासात रस न उरणे अशा समस्या निर्माण होत आहेत.

विशेषतः रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेचे चक्र बिघडते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. डोळ्यांचे विकार, मान-पाठदुखी, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने येणाऱ्या पिढीचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन युवा नेते अॅड. यशराजे गावात साळुंखे-पाटील यांनी सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची संकल्पना मांडली.

या संकल्पनेनुसार सरपंच मागाडे यांनी उपसरपंच नवाज खलिफा, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील व्यापारी, महिला आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला. जवळा ग्रामस्थांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.