वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजची विद्यार्थिनी कु. साक्षी अनिल सूर्यवंशी हिने अझरबैजान, बाकु देशात झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये ५० मीटर फ्री पिस्टल वर्ल्ड चॅम्पियन शूटिंग स्पर्धेत आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या सर्व शाखांच्या विद्याथ्र्यांनी शहरातून तिची भव्य सवाद्य मिरवणूक काढली. संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज आणि खा. एस. डी. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील, प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव, फिजिकल डायरेक्टर प्रा. डॉ. एच. ए. नारायणकर साक्षी सूर्यवंशी हिची इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. समन्वयक प्रा. डॉ. मंगल लोंढे, सर्व विभाग प्रमुख सहकारी, माजी विद्यार्थी आदिनाथ झेंडे उपस्थित होते. वाय. सी. कॉलेजच्या कला, वाणिज्य विज्ञान, बीबीए, बीसीए, ज्युनिअर, बीसीएस, एम.कॉम आदी सर्व शाखातील सर्व विद्यार्थी अभिनंदन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक तहसील कचेरी परिसरात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यल्लामा चौक, गांधी चौक, बसस्थानक मार्गाने मिरवणुकीची सांगता वाळवा पं.स.च्या प्रांगणातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादनाने झाली. शिक्षक बंधू-भगिनी फेटे बांधून मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते. वाळवा पं.स.चे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी कु. साक्षी हिचे अभिनंदन केले. शहरात मिरवणुकीमध्ये देखील ठिकठिकाणी कु. साक्षी हिचे शहरवासियानी अभिनंदन केले.
इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये ५० मीटर फ्री पिस्टल वर्ल्ड चॅम्पियन शूटिंग स्पर्धेच्या तिच्या तयारीसाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एस. डी. पाटील स्टेडियममध्ये संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नाने सुमारे १५ लाख खर्चून स्वतंत्र कोर्ट तयार केले आहे. शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच कॉलेजने गुणवत्ता शिष्यवृत्ती, एन.एस.एस तसेच सांस्कृतिक, कला, हॉकी, सॉफ्ट बॉल अशा विविध प्रकारात देखील सांघिक विजेतेपद अशा सर्व स्तरावरही आपले वेगळेपण जपल्याची माहिती प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी दिली.