शिवाजी विद्यापीठातील प्रकार आला उघडकीस……

नुकत्याच झालेल्या एका क्रीडा प्रकाराच्या स्पर्धेतच खेळाडूचे कीट सर्वांसमोर फाटले असून, ते खेदजनक आहे. निकृष्ट दर्जाचे कीट दिल्‍याने असा प्रकार घडला आहे. जबरदस्तीने कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन जेवण भत्ता कापला.त्यामुळे चहा-बिस्किटे खाण्याची वेळ आली. रेल्वेची तिकिटे निश्चित झाली नसल्याने दोन दिवस बसून प्रवास करावा लागला.

याबाबत विचारणा केल्यावर संघ व्यवस्थापक, प्रशिक्षकांनी बदला घेण्याची धमकी दिली, अशी व्यथा बॉक्सिंगच्या महिला खेळाडूंनी शिवाजी विद्यापीठात मांडली आहे. या बेजबाबदार व्यवस्थापक, प्रशिक्षकांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मोहोली (पंजाब) येथे २५ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ गेला होता. त्यावेळी व्यवस्थापक, प्रशिक्षकांनी दिलेला त्रास आणि त्यामुळे झालेल्या गैरसोयीबाबतच्या तक्रारींचा पाढाच या खेळाडूंनी कुलसचिवांसमोर वाचला.

दहा दिवसांचा एकूण २९०० रुपये जेवणाचा भत्ता मिळणे अपेक्षित असताना आमच्याकडून जबरदस्तीने कोऱ्या पेपरवर सह्या घेऊन प्रत्येकी ५०० रुपये दिले. त्यावर विचारले असता रेल्वे तिकिटासाठी एजंटाला कमिशन दिल्याचे कारण व्यवस्थापकांनी सांगितले.

जेवण भत्ता कापून घेतल्याने चहा-बिस्कीट खाण्याची वेळ आली. परतीच्या प्रवासात दोन तिकिटे वगळता इतर तिकिटे निश्चित (कन्फर्म) नव्हती. त्यामुळे दोन दिवस बसून प्रवास करावा लागला. स्पर्धेत सामन्यावेळी व्यवस्थापक तेथे आलेच नाहीत. त्याबाबत आम्ही पालकांना माहिती दिली.

पालकांनी व्यवस्थापक, प्रशिक्षकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेला तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. पुढच्या स्पर्धेसाठी आम्हीच असणार. याचा बदला घेऊ, अशी धमकी दिल्याचे खेळाडूंनी कुलसचिवांना सांगितले.

नुकत्याच झालेल्या एका क्रीडा प्रकाराच्या स्पर्धेतच खेळाडूचे कीट सर्वांसमोर फाटले असून, ते खेदजनक आहे. निकृष्ट दर्जाचे कीट दिल्‍याने असा प्रकार घडला आहे. क्रीडा अधिविभागात काही क्रीडा प्रकारांचे कॅम्पही वेळेवर होत नाहीत. त्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी युवासेनेने कुलगुरू आणि कुलसचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.