सोलापूर जिल्ह्यातील ३३१९ शेतकऱ्यांना मिळणार विहिरी….

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पाण्याची खूपच कमतरता जाणवते. यामुळे शेतकरी हा पाण्याअभावी खूपच हवालदिल आहे.

अशातच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विहिरी मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १५ शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी मिळणार आहेत. यंदा तीन हजार ३१९ शेतकऱ्यांनी विहिरींसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्या प्रस्तावांना संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ४५ दिवसांत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता द्यावी, असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिले आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला प्रस्ताव पाठवावा लागतो.

MAHA EGS Horti या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना विहिरीसाठी अर्ज करता येतो. मागील दीड-दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ३१९ शेतकऱ्यांनी विहिरीची मागणी केली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे तुर्तास जिल्ह्यातील तीन हजार ३१९ शेतकऱ्यांच्या विहिरी वेळेत पूर्ण होतील, अशी आशा आहे.