सांगोल्यातील डाळिंबाची युरोपात होतेय निर्यात

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सोलापूरची डाळिंब खूपच प्रसिद्ध आहेत. अगदी लालसर, गोड अशी डाळिंबाची ख्याती सर्वत्र पसरलेली आहेच. माळरानावर डाळिंबांच्या बागा आपणाला सांगोला तालुक्यात पाहायला मिळतात. अशीच सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील सोपान शिंगाडे या शेतकऱ्यांने खडकाळ माळरानावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. त्यांचे हे डाळींब युरोपात निर्यात होत आहे.

लाल भडक अशा डाळिंबाला प्रति किलो १२५ रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर गौडवाडी गाव‌ आहे. या भागात कायमस्वरूपी दुष्काळ जाणवत असतो. यामुळे येथील लोक रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी स्थलांतरीत झाले आहेत.

दरम्यान मागील तीन वर्षांपासून टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्याने या भागात डाळिंब लागवड वाढली आहे. दरम्यान सोपान शिंगाडे (Farmer) यांनी ऊस तोड मजुरी करून खडकाळ माळरानवर डाळिंब शेती फुलवली आहे. शिंगाडे यांच्याकडे आजपर्यंत २० एकर क्षेत्रावर भगवा डाळिंब बाग आहे.

सध्या आठ एकरावरील डाळिंबाची काढणी सुरू आहे.वजन, आकार, रंग आणि चव अशी विविध गुणवैशिष्ट्ये असलेले त्यांचे डाळिंब युरोपात निर्यात झाले आहे. एकाच वेळी ४० टन डाळिंब युरोपात निर्यात झाले आहे. यातून शिंगाडे यांना सुमारे ५० लाख रूपयांचे उत्पन्न हाती आले आहे.

लागवडीपासून ते फळ धारणेपर्यंत शिंगाडे यांनी बागेचे योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांना निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. त्यांची ही डाळिंब बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.