प्रेयसीच्या घरात घुसून वायरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न

पीडित महिला व दिलीप पागडे यांची गेली चार वर्षांपासून ओळख आहे. यातून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे काही कारणामुळे दोघांमध्ये वाद झाल्याने महिलेने पागडे याच्या सोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकले होते. सबंध संपल्याबाबत महिलेने स्टँप पेपरवर लिहूनही घेतले होते.

तरीदेखील पागडे याने वारंवार महिलेचा कामावर येता-जाता पाठलाग करत संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिलेला तिच्या घरासमोर अंगणात गाठले. महिलेच्या पाठीमागून येवून घरात प्रवेश केला. तिला ठार मारण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक वायरच्या साहाय्याने गळा आवळला.

झटापट व आरडाओरडा करत वेळीच तावडीतून सुटल्याने महिलेचा जीव वाचला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिली. ही घटना काल (बुधवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी दिलीप राजेंद्र पागडे (वय ३४, रा. संगमनगर, तारदाळ) याच्यावर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.