भारताविरुद्धच्या लढतीसाठी मोठ्या आवाजात खेळण्याचा सराव करा

अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध खेळताना एक लाखाहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहेत. ते भारतासाठी १२ खेळाडू असतील. त्यामुळे तुम्ही आतापासूनच प्रेक्षकांच्या प्रचंड आवाजात कसे खेळायचे याचा विचार करून तयारी करा, असा सल्ला पाकचे माजी खेळाडू मुश्ताक अहमद यांनी बाबर आझम आणि त्यांच्या संघाला दिला आहे.

केवळ दोन खेळाडूंचा अपवाद वगळता पाकचे इतर सर्व खेळाडू भारतात प्रथमच खेळणार आहेत. त्यामुळे पूर्णतः भारतीय प्रेक्षकांचा पाठिंबा यजमान संघाला असताना आपण कसा खेळ करायचा, याचा अभ्यास पाक संघाने केला असेल. भारतात खेळताना प्रेक्षक हा घटक सर्वात महत्त्वाचा असतो.

२०१२ मधील इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यातील कसोटी सामन्यात मी अनुभवले आहे, असे मुश्ताक म्हणाले. त्यावेळी मुश्ताक इंग्लंड संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते. या दौऱ्यात इंग्लंडने भारताविरुद्धची मालिका जिंकली होती.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व डाटा उपलब्ध होत असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी सामना खेळायचा असेल तर तेथील सर्व परिस्थितीची माहिती मिळत असते. पाकचे खेळाडू प्रथमच भारतात खेळत असले तरी ते मानसिक तयारी या माहितीच्या आधारे करू शकतात, असे मुश्ताक यांनी म्हटले आहे.

२०१२ च्या दौऱ्यात मी इंग्लंड संघासोबत असताना आम्ही सरावाच्या वेळी स्टेडियममध्ये काही प्रेक्षकांना उभे करून त्यांना आवाज करायला सांगितले होते आणि त्याचा फायदा आम्हाला प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी झाला, असे मुश्ताक यांनी सांगितले.

पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या तुलनेत भारतातील खेळपट्ट्या पाटा असतात. त्यामुळे येथे क्षेत्ररक्षण रचना महत्त्वाची ठरते. पाक संघाचे व्यवस्थापन यावर मार्ग काढेल, अशी अपेक्षा मुश्ताक यांनी व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात भारतावरच अधिक दडपण असेल, असेही सांगितले.