हातकणंगले परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात….

आजकाल बदलत्या वातावरणामुळे अनेक रोगाचा सामना जनतेला करावा लागत आहे. भरमसाट पैसे देखील खर्च करावे लागतात. बाहेरचे खाणे याकडे लोकांचा कल जास्त दिसून येतो. उघड्यावरील अन्न देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. प्रत्येक गावागावात हातगाड्याचे प्रमाण खूप जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे हातकणंगले परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थांची खुलेआमपणे विक्री केली जात आहे.

परवाना न घेताच खुलेआम खाद्यपदार्थाची विक्री होत असल्यामुळे या कार्यालयाच्या अस्तित्वावर नागरिक शंका उपस्थित करत आहेत. या कार्यालयाचा जनसंपर्कही इतका कमी आहे की, तक्रार कोठे करायची असाही संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हातकणंगले परिसरात अनेक बेकरीमधून निकृष्ट दर्जाचे बेकरी पदार्थ खुलेआमपणे विक्री केली जात आहे. काही ठिकाणी भेसळयुक्त पदार्थही बनवून विक्री केली जात आहे. एकदाही चौकशी न झाल्याने व्यवसाय जोमातच सुरू आहे. अनेक बेकरीमधून निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवले आहेत. याची कोणतीही गुणवत्ता चाचणी न करता हे पदार्थ विक्री झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.