कोल्हापुरात अंगणवाडी सेविकांचा तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको

अंगणवाडी सेविकांना दर महिना २६ हजार रुपये व मदतनीसांना २० हजार रूपये वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी दीड महिन्यांहून अधिक काळ संप करूनही सरकार गंभीर नसल्याने मंगळवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली येथील तावडे हॉटेल चौकात रस्ता रोको आंदोलन केले.रणरणत्या उन्हात सेविका मोठ्या संख्येने तब्बल एक तास रस्त्यावर ठिय्या मारल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली.

महामार्गावर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे १०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत चौकातील सर्व रस्ते रोखून त्यांनी रोखले.

तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला.दरम्यान, सरकार मागण्यांकडे दूर्लक्ष करीत असल्याने बुधवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा, यावेळी संघाचे अतुल दिघे यांनी जाहीर केले.