अलीकडच्या काळात अनेक क्राईम च्या घटना घडताना आपणाला दिसतच आहेत. काही ठिकाणी खून तर काही ठिकाणी हाणामारी, चोरी. अशीच एक हादरवून टाकणारी घटना इचलकरंजीत घडली आहे. इचलकरंजीत शहापूर खणीत हातपाय बांधलेल्या स्थितीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला.
एका बेवारस पुरुषाचा मृतदेहाचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांना आहे. मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शहापूर रोडवरील खणीत मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एकाचा मृतदेह नागरिकांना तरंगत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती समजल्यानंतर शहापूरचे पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खणीबाहेर काढण्यात आला. प्रथमदर्शनी मृताचे पाय पँटने तर हात बुटाच्या लेन्स बांधल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट दिली. दोन दिवसांपूर्वी मृतदेह खणीत पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शहापूर पोलीस ठाण्यासह गावभाग, शिवाजीनगर हद्दीतील बेपत्ता गुन्ह्यांची माहिती घेण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे गूढ उलगडणार आहे.