इचलकरंजीतील शहापूर खणीत मिळालेल्या मृतदेहाची पटली ओळख

शहापूर रोडलगत असलेल्या खणीत मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना निदर्शनास आले. ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर शहापूरचे पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षक जवान शाहीर जावळे यांच्यासह पथकाला पाचारण करून मृतदेह खणीबाहेर काढण्यात आला. त्यावेळी मृताचे पाय पँटने तर हात बुटाच्या लेसने बांधल्याचे आढळून आल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट दिली.

दोन दिवसांपूर्वी मृतदेह खणीत पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इचलकरंजी येथील शहापूर खणीमध्ये मंगळवारी रात्री हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. मृताचे नांव धोंडीराम दादू राशिवडे (रा. कबनूर) असे असून त्याचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

शहापूर पोलीस ठाण्यासह गावभाग, शिवाजीनगर हद्दीतील बेपत्ता गुन्ह्यांची माहिती घेण्यासह मृतदेहावरील कपडे व इतर खाणाखुणा च्या माध्यमातून ओळख पटवण्याचे काम सुरु होते. त्यामध्ये बुधवारी सायंकाळी सदरचा मृतदेह हा कबनूर येथील धोंडीराम दादू राशिवडे याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. मृतदेह बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने राशिवडे याचा घातपात झाल्याचा संशय वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिस तपास सुरु आहे.