टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 5 मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या इंग्लंडने बेझबॉल पद्धतीनेच बॅटिंग केली. सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र टीम इंडियाच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडला सुरुंग लावला. या दोघांनी अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 3 धक्के देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला.
इंग्लंडने पहिल्या सत्रात लंच ब्रेकपर्यंत 3 विकेट्स गमावून 28 ओव्हरमध्ये 108 धावा केल्या.या लंच ब्रेकदरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच त्याने अनेक मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. दिनेश कार्तिक याने मैदानात घेतलेल्या या मुलाखतीत रोहितने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. तो काय बोलला हे जाणून घेऊयात. रोहित आता 36 वर्षांचा आहे. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे.
यावर रोहितने बेधडक विधान केलं.“जेव्हा मला वाटेल की मी खेळू शकत नाही. तेव्हा मी निवृत्ती घेईन. गेल्या काही वर्षात माझा खेळ सुधारला आहे”, असं रोहित स्पष्टपणे म्हणाला. तसेच रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 मधील अंतिम सामन्यातील पराभवाबाबतही प्रतिक्रिया दिली. “कोणतीही चॅम्पियनशीप गमावल्यनंतर दु:ख होतं”, असं रोहित म्हणाला.
टीम इंडियाला गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभव ठरला. त्याआधी 2021 मध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला रोखत पहिल्याच झटक्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला होता.
रोहित शर्माच्या या मुलाखतीचा संपूर्ण व्हीडिओ हा काही वेळात जिओ सिनेमावर पाहायला मिळेल. या मुलाखतीत रोहितने अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीची प्रतिक्षा आता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.