इस्लामपूर एसटी वाहकाकडून तीन लाखांचा गंडा!

इस्लामपूर एसटी आगारातील वाहकाने अधिकृत तिकीट मशीन न वापरता बनावट मोबाइल प्रिंटरचा वापर करून एसटी महामंडळास अंदाजे दोन ते तीन लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने आगारात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाहक विवेक रमेश गोंधळी (वय २६, रा. कोरेगाव, ता. वाळवा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नंदकुमार जगन्नाथ जाधव (वय ५६, रा. वाळवा) या आगारातील कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवेक गोंधळी हा इस्लामपूर आगारातून नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, कराड तसेच ग्रामीण भागात वाहतुकीदरम्यान वाहक म्हणून सेवा करत होता. या नेमलेल्या कर्तव्यादरम्यान गोंधळी हा शासकीय इबीक्स कंपनीच्या मशीनद्वारे तिकीट न देता त्याच्याजवळ असलेल्या अवैध कंपनीच्या मोबाइल प्रिंटरद्वारे मोबाइलमध्ये बनावट तिकीट तयार करून त्याची प्रिंट काढून प्रवाशांना देत होता.

या तिकिटाचे पैसे ठकसेन गोंधळी हा स्वत:जवळ ठेवून घेत होता. या माध्यमातून तो शासनाची व राज्य परिवहन महामंडळाची फसवणूक करत होता. गोंधळी याच्या कारनाम्याची माहिती एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्याने बनावट तिकीट बनवून शासकीय तिकिटांचे बनावटीकरण केल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार गोंधळी याच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२३ पासून गोंधळी हा बनावटगिरी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास तीन लाख रुपयांना त्याने गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. इस्लामपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.