एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, नाचत-आनंद व्यक्त करत राज्यभरातून जमलेल्या मराठा बांधवांमुळे नवी मुबईत रात्रभर भगवे वादळ अवतरले.
आता नाही तर कधीच नाही, या भावनेने सतत मराठा बांधव येथे जमत होते.त्यामुळे सायन-पनवेल मार्ग गर्दीने ओसंडून वाहात होता. ठिकठिकाणी करण्यात आलेली जेवणाची व्यवस्था, काहींनी रस्त्यातच मांडलेले ठाण… तेथेच घेतलेले जेवण यामुळे सारे वातावरण भारून गेले होते.
आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला. ते पहाटे सहकाऱ्यांसह नवी मुंबईत पोहोचले. या मोर्चाला नवी मुंबईतच थांबवण्याचे प्रयत्न सरकारकडून विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुरू होते.
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाबाबत नोटीस दिली असली, तरी आम्ही हौस म्हणून मुंबईला निघालेलो नाही, आता आरक्षण घेऊनच माघारी फिरणार असा निर्धार जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ते २६ जानेवारीला सकाळी नवी मुंबईतून मुंबईसाठी निघतील. आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनासाठी स्टेजची बांधणी सुरू आहे.
