हालोंडी येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव

हालोंडी (ता. हातकणंगले) येथे श्रीमद्ददेवाधिदेव १००८ भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थकार जिन मंदिर व मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्ती निमित्त श्रीमद्ददेवाधिदेव १००८ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. ३१ जानेवारी ते रविवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव होणार आहे. श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिर कमिटी, श्रीमद्ददेवाधिदेव १००८ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव समिती, समस्त दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महामहोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवार दिनांक ३१ रोजी पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोष, सव्वापाच वाजता यजमानांच्या घरी मंगल स्नान, नांदी मंगल, आणि मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी सहा वाजता मूलनायक भगवतांचा पंचामृत अभिषेक, महाशांती मंत्र, आचार्य श्री निमंत्रण, प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्यावंदन, इंद्र यजमान प्रतिष्ठा, कंकण बंधन, व्रत बंधन, ध्वजारोहण, मंडप उद‌घाटन, मंडप प्रतिष्ठा, कलश स्थापना दातारांची हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानास प्रारंभ होणार आहे.

या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी ६ पासून रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता हत्तीवरून सवाद्य मिरवणूक होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी हेलिकॉप्टर आणि अन्य सवाल होणार आहेत.

२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मौजी बंधन उपनयन संस्कार विधी होणार आहे. दुपारी चार वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता रथोत्सवाचा सवाल होईल. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या कालावधीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. दररोज दुपारी चार वाजता आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे.