दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तब्येतीच्या काही ना काही कुरबुरी सुरु असणे ही काही मोठी बाब नाही. प्रदूषण, वेळी अवेळी खाणे, अपुरी झोप, बदलते हवामान, सततची धावपळ इत्यादी कारणांमुळे लहान सहान आजार उद्भवत असतात. या आजारांसाठी करता येण्यासारखे घरगुती उपचार जाणून घेऊ.
दातदुखी
जर अचानक दातदुखी सुरु झाली, तर जो दात दुखतो आहे, त्यावर कांद्याचा एक लहानसा तुकडा ठेवावा. जर दातांमध्ये काही इन्फेक्शन असेल, तर कांद्यातील अँटी बॅक्टेरियल तत्वे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतील.
तोंडामध्ये अल्सर्स
कित्येकदा उष्णतेने किंवा अन्य कुठल्या कारणाने तोंड येते, किंवा तोंडामध्ये अल्सर्स होतात. ओल्या नारळातील खोबरे खाल्ल्याने अल्सर्स कमी होतात. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तत्वे असतात, त्यामुळे अल्सर्स बरे होण्यास मदत मिळते. तसेच नारळाचे दूध काढून घेऊन त्याने चुळा भरल्यास ही आराम मिळतो.
सर्दीमुळे नाक सतत बंद
सर्दीमुळे नाक सतत बंद राहिल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. अश्या वेळी तव्यावर काळ्या मिरीचे चार दाणे गरम करून त्यातून आलेली वाफ घेतल्याने नाक मोकळे होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता
वेळी अवेळी जेवणे, सतत बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे, किंवा आहारामध्ये प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे प्रमाण जास्त असणे इत्यादी गोष्टींमुळे बद्धकोष्ठाचा त्रास उद्भवतो. या करिता रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा जिरे पाण्याबरोबर घ्यावेत.
तसेच सकाळी उठल्यावरही एक चमचा जिरे कोमट पाण्याबरोबर घ्यावेत. थोडास ओवा कोरडाच तव्यावर भाजून घ्यावा आणि त्यामध्ये किंचित मीठ मिसळून खावा. त्यावर कोमट पाणी घ्यावे. त्याने ही बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होते.