बारावी-दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यावर्षी सहायक परिरक्षकांकडून प्रश्नपत्रिका ‘इन कॅमेरा’ परीक्षा केंद्र संचालकांकडे जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा व केंद्रांतील गैरप्रकारास आळा बसणार आहे.
सध्या बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. 10 फेब-वारीपासून दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल. त्यानंतर 21 फेब्रुवारीला बारावीची तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. दोन्ही परीक्षेत अनेकदा गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवूनही कॉपी प्रकरणे कमी झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
बारावी-दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिका सहायक परिरक्षक (रनर) कस्टोडियन यांच्याकडून घेताना त्याचे व्हिडीओ शूटिंग करणार आहेत. लोकेशनसाठी त्यांनी मोबाईलचे ‘जीपीएस’ सुरू ठेवायचे आहे. प्रश्नपत्रिका केंद्र संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यापासून ते कपाटात ठेवण्यापर्यंतची सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करायचे आहे, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.
यावर्षी प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहेत. सद्य:स्थितीत बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून अनेक ठिकाणी ओएमआर शीट डाऊनलोड करताना अडचणी येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. विभागीय मंडळाच्या अखत्यारीतील ईडीपी सेक्शन यांच्याकडे शाळा, हायस्कूलच्या तक्रारी, अडचणी सोडविल्या जाणार आहेत.