सध्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापली मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आपणाला पहायला मिळत आहे. लोकसभाआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती भाजपच्या कार्यकत्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी. ‘गाव ‘चलो’ अभियानांतर्गत ‘मोदी की गॅरंटी’चा नारा गावोगावी पोहोचविला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षे पूर्ण झाली असून सरकारने विविध क्षेत्रांत दमदार कामगिरी केली आहे. सक्षम कार्यकर्ता ही भाजपची ओळख असल्याने २०४७ पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचा ठाम विश्वास माढा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची विकासाची दृष्टी गरिबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंतपोहोचविण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानासंदर्भात मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी सांगोल्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.