आपल्या सगळ्यांना माहितच आहे कि सध्या भटक्या कुत्र्यांचा त्रास गावोगावी सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस शहरातील गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून सर्वत्र भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा महापालिकेची असली तरी तुटपुंजी साधने आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही यंत्रणा आत्ताच्या घडीला हतबल बनली आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीनी कित्येकांचे प्राण घेतल्याच्या घटना ताज्या आहेत. कुत्रे चावण्याचे प्रमाण तर फारच वाढले असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका यंत्रणेसह संपूर्ण समाजाने पावले उचलली पाहिजेत.
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीही भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे, मग उपनगरे आणि ग्रामीण भागाची यापेक्षाही विदारक स्थिती आहे. मैदाने, स्टेडियम, ओढ्याच्या तसेच कचरा असलेल्या ठिकाणी १-२ नव्हे तर १५-२० कुत्र्यांच्या झुंडी असतात. शहरात दिवसातून ४-५ जणांचा तर चावा घेतलेलाच असतो, त्यामुळे अँटीरेबिज व्हॅक्सिन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग यासाठी सरकारी दवाखाना गाठावा लागतो, ती असहाय्य इंजेक्शन घेणे क्रमप्राप्त असते. याबरोबरच कुत्रे गाड्यांच्या आडवे आल्याने होणारे अपघात तर वेगळेच आहेत, यामध्ये वाहनचालकाला होणारी दुखापत तसेच होणारे हे वेगळेच आहेत.
शहर व परिसरात हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, मटण, मासे, चिकन ६५ अशा दुकानांची संख्या वाढली आहे. यामुळे भटकी कुत्री हिंसक बनू लागली आहेत. त्यांना हे खाद्य न मिळाल्यास ते नागरिकांचा चावा घेण्याची अधिक शक्यता आहे. खाद्यपदार्थाच्या गाड्या तसेच हॉटेलमधून शिल्लक अन्न व मांस बाहेर टाकल्यामुळे कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात, अणि त्यातून अनर्थ घडण्याची जास्त शक्यता आहे. आता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हॉटेल्स, हातगाड्या तसेच अन्य विक्रेत्यांनी त्यांच्याकडील शिल्लक अन्नाच्या विल्हेवाटीची स्वतंत्र व्यवस्था तैनात करुन समाजहीत जोपासणे गरजेचे आहे.