शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होणे अपेक्षित आहे.
१० तारीख उजाडली तरी राज्य सरकारकडून अद्याप शिक्षकांच्या वेतनासाठीचे अनुदान वितरित झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांना पगाराची प्रतीक्षाच करावी लागत आहे.सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये, महापालिका, नगरपालिकांमधील शिक्षकांना पगार मिळालेला नाही.
वेतन अधीक्षक म्हणाले, अद्याप शासनाकडून वेतनासाठीचा निधी प्राप्त झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील जवळपास १४ हजार शिक्षक असून त्यांना दरमहा पगारासाठी अंदाजे ८२ कोटी रुपये लागतात.जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमधील साडेआठ हजार शिक्षकांसाठी दरमहा ९३ कोटी तर अनुदानित खासगी प्राथमिक शाळा व महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील दोन हजार ७०० शिक्षकांसाठी अंदाजे १७ कोटी रुपये लागतात. एका सोलापूर जिल्ह्यातील २५ हजार २०० शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा १९२ कोटी रुपये अपेक्षित आहेत.