पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा आता ४५ दिवसांऐवजी अवघ्या ३० दिवसांतच उरकली जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सत्र परीक्षेचा कालवधी कमी करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत झाला आहे.
त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र समिती नेमली आहे.राज्यात एकाच जिल्ह्यापुरते विद्यापीठ म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठाशी संलग्नित एकूण १०९ महाविद्यालये असून त्याअंतर्गत जवळपास ८० हजार विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. पण, विद्यापीठ स्थापन झाल्यापासून नेहमीच विद्यापीठ परीक्षा व निकालाच्या गोंधळामुळे चर्चेत राहिले आहे. पुणे, मुंबईसह अन्य विद्यापीठाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी असतानाही परीक्षेचा कालावधी तब्बल ४५ दिवस होता. आता तो ३३ दिवसांवर आणण्यात आला आहे, पण ३० दिवसांतच परीक्षा व्हायला हवी म्हणजे निकालास विलंब लागणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार नाहीत हा त्यामागील हेतू आहे. त्यादृष्टीने समितीचा अभ्यास सुरू असून पुढच्या आठवड्यात कुलगुरूंना समिती अहवाल सादर करेल. त्यानुसार आगामी सत्र परीक्षा ३० दिवसांत संपविण्याचा प्रयत्न विद्यापीठाचा आहे.