राज्याच्या ‘या’ भागांवर पावसाचं सावट

सध्या वातावरणात सतत बदल पहायला मिळत आहे. वातावरणाचा परिणाम सर्व घटकांवर पहायला मिळतच आहे. कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी झंझावात अशा स्थितीमुळं राज्यातून सध्या थंडीनं काढता पाय घेतला आहे. परिणामी राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीनं झोडपलं आहे. अवकाळीच्या माऱ्यामुळं इथं शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यापुढं अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येसुद्धा मराठवाडा आणि विदर्भावर पावसाचं सावट कायम राहणार असून, काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये असणारी थंडी वगळता उर्वरित राज्यामध्ये मात्र आता लख्ख सूर्यप्रकाश पडू लागला असून, दुपारच्या वेळी तापमान उच्चांक गाठताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही आता थंडीनं दडी मारली असून, इथं हवेत दमटपणा जाणवू लागल्यानं उष्णतेचा दाह अधिक जाणवू लागला आहे. ठाणे आणि मुंबईतही तापमानाचा आकडा वाढत असून, ठाण्यामध्ये दिवसाचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचू लागला आहे. थोडक्यात फेब्रुवारी संपण्यापूर्वीच राज्यात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.