भारतातील छोट्या पडद्यावरील पहिला ‘सुपरहिरो’असणाऱ्या शक्तिमानने 90 च्या दशकातील मुलांवर आपली छाप सोडली होती. छोट्या पडद्यावरील या सुपरहिरोने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. आजही शक्तिमानचे गारुड कायम आहे. आता हाच शक्तिमान रुपेरी पडद्यावर येणार आहे. टीव्हीवर शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना हे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मुकेश खन्ना यांना आपल्या शक्तिमान चित्रपटाचा नायक मिळाला असून अभिनेता रणवीर सिंग शक्तिमानची भूमिका साकारणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने पुढील दोन वर्षांच्या तारखा बुक केल्या आहेत. यामध्ये रणवीर सिंग ‘डॉन 3’ आणि ‘शक्तिमान’ या दोन चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील काही वर्षांपासून शक्तिमान चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
वर्ष 2022 मध्ये मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ चित्रपटासाठी सोनी पिक्चर्स इंडियासोबत भागिदारी केली.त्यानंतर एक टीझरही रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये ‘शक्तिमान’ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, शक्तिमानची भूमिका कोण साकारणार हे निश्चित होऊ शकले नाही.
पण आता याची पुष्टी झाली आहे. अभिनेता रणवीर सिंग आता शक्तिमान होणार आहे.वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत शक्तिमान चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होईल. त्यानंतर चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन सुरू होईल.सूत्रांच्या माहितीनुसार, 2025 मध्ये चित्रीकरण सुरू होईल आणि 2026 मध्ये शक्तिमान रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
