बंडखोर सेना पक्षाचा पेठवडगाव येथे मंगळवारी महामेळावा

बंडखोर सेना पक्षाचा राज्यव्यापी शिवगर्जना महामेळावा मंगळवारी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता पेठवडगाव नगरपालिका चौक येथे होणार आहे. याची माहिती बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी दिली.मेळाव्यामध्ये आगामी लोकसभेबाबतची भूमिका, तसेच अनेक महत्त्वाचे ठरावही केले जाणार असल्याचे सांगितले.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. रवींद्रनाथ माळी म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रासह रायगड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा यासह अन्य काही जिल्ह्यांमधील बंडखोर सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्या माजी नगराध्यक्षा विद्या पोळ उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे असून स्वागताध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन वाघमारे आहेत.’ महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन वाघमारे यांनी केले आहे.